तालुका पोलिसांनी ठोकल्या  मंगळसूत्र चोरट्याला बेड्या

बारा तासांत संशयित जेरबंद

सातारा  – लिंब (ता. सातारा) येथील वृध्द दाम्पत्याच्या घरातून मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला तालुका पोलिसांनी बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी वसंत सदाशिव शिंदे (रा. लिंब, ता. सातारा) यांनी रविवारी दि. 7 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शिंदे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात तालुका पोलिसांनी संशयित धनंजय मधुकर लोखंडे (रा. भुईंज सध्या रा. लिंब) याला सोमवारी अटक केली.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिंदे लिंब येथील त्यांच्या घरात पत्नीसमवेत राहण्यास आहेत. त्यांची पत्नी आजारी असल्याने ते दि. 6 रोजी पत्नीची सेवा करत होते. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्या घरातील 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले.

रात्री उशिरा चोरी झाल्याचे शिंदे याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजूला विचारणा केली मात्र, कोणीही चोरीची कबुली न दिल्याने त्यांनी दि. 7 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीची तक्रार दिली होती. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या बारा तासांत संशयिताला बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर चोरीच्या गुह्यात लोखंडे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम, पोलीस हवालदार राजू मुलाणी, दादा परिहार, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांनी ही कारवाई केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.