बारामती- माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर सत्तांतर झाले असून रविवारी (दि. 8) नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. मात्र, गत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने दि. 4 एप्रिल 2020 पर्यंत अध्यक्ष रंजन तावरेच असणार असल्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष 4 एप्रिलपर्यंत पदापासून दूर राहणार आहेत.
राज्यात गाजलेल्या माळेगाव (ता. बारामती) कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी तावरे गुरू-शिष्याच्या जोडीवर मात करीत कारखान्यात सतांत्तर घडवून आणले. नवनिर्वाचित संचालकांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून कारखान्याच्या कारभारात हस्तक्षेप करीत कामकाज हातात घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी मावळते सत्ताधारी रंजन तावरे विरुद्ध नवनिर्वाचित संचालकांमध्ये दैनंदिन कामकाजावरून मंगळवारी (दि. 3) चांगलाच वाद पेटला होता. त्याचे लोण थेट न्यायालयाच्या दरबारात पोचले.
दरम्यानच्या कालावधीत अध्यक्ष रंजन तावरे यांनी 97 व्या घटना दुरुस्तीचा आधार घेत पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणे हा आमचा हक्क आहे, ते कोणीही हिरावून घेवू शकत नाही, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयापुढे केला. तो न्यायालयाने मान्य करीत कारखान्याचे कामकाज रंजन तावरेच पहातील असा कौल दिला. त्यामुळे पूर्व नियोजित ठरल्याप्रमाणे रविवारी कारखान्याचे अध्यक्ष -उपाध्यक्षांची जरी निवड केली असली तरी 4 एप्रिल 2020 पर्यंत या नवीन जोडीला कारभारात लक्ष घालता येणार नाही हे स्पष्ट आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या सुरुवातील कारखान्याच्या गेस्ट हाऊस येथे राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित संचालक तसेच कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे ,केशवराव जगताप, मदन देवकाते, योगेश जगताप, अनिल तावरे, सुनिल पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर औपचारकीता म्हणून कारखान्याच्या कार्यालयीन सभागृहांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाहूराज हिरे तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. कुंभार यांनी काम पाहिले.
- अजित पवारांच्या सूचनेने निवड
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचावर्षिक निवडणूक 25 फेब्रूवारी पार पडली. विशेषतः या निवडणुकीत अजित पवार यांनी बाजी मारत राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलचा विजय खेचून आणला, तर विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचा पराभव झाला. या सत्तासंघर्षात रंजन तावरे यांच्यासह चौघांना मतदारांनी निवडून दिले. त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार कोणाची वर्णी लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार अध्यक्षपदी बाळासाहेब तावरे तर उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची निवड करण्यात आले आहे.