नगर -एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागात 2018 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापि देय असणारी हक्काची उपदान, भविष्य निर्वाह निधी तसेच त्यांच्या खात्यात जमा असणारे रजेचे रोख रकमेचे पैसे देण्यात आलेले नाही.
ही थकित देयके मिळण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार (दि.4) रोजी एसटी महामंडळाच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर, बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
सेवानिवृत्त एसटी कामगारांना सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचे देय असणारी रक्कम अदा करणे गरजेचे असताना अहमदनगर विभागात अद्यापि कर्मचाऱ्यांना पैशाचे वाटप करण्यात आलेले नाही. सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनेतर्फे तसेच वैयक्तिक रित्या कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असता अद्यापि मुंबई कार्यालयाकडून पैसे आलेले नाहीत, पैसे आल्यानंतर वाटप करू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.
यामुळे अहमदनगर विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह व संभ्रम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन ही चालू झाली नसल्याने कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याने निवृत्त कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.