दिगंबर पडकर
जळोची- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने टाळेबंदीच्या काळात पोलीस प्रशासनाकडून टाळेबंदीचे उल्लंघन करणा-यांवर बारामती उपविभागात सुमारे १ हजार ४२५ कारवाईया करण्यात आल्या आहेत.
जगभरात आहाकार माजवलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती उपविभागात प्रशासन,आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासनाने कंबर कसून आपले कर्तव्य बजावल्याने करोनाला थोपवण्यात यश मिळवले.
टाळेबंदीच्या काळात पोलीस प्रशासनाकडून बारामती उपविभागातील बारामती शहर, तालुका, वडगाव निंबाळकर व इंदापूर, वालचंदनगर, भिगवण या ठिकाणी विनाकारण रस्त्यावर फिरणे, समाज माध्यमावर अफवा पसरवणे, मास्कचा वापर न करणे, अवैद्य दारू विक्री तसेच टाळेबंदीत मनाई असतानाही दुकाने चालू ठेवणे तसेच चढ्या भावात वस्तूंची विक्री करणे तसेच वाहतुकीस बंदी असतानाही वाहतूक करणा-या १ हजार ४२५ जणांवर कारवाईया करण्यात आल्या आहेत. यात ६७ जणांना शिक्षाही झाली आहे.
पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाईया सुरू असल्याने विनाकारण फिरणार यांची संख्या कमी झाली. तसेच टाळेबंदीचा गैरफायदा घेत चढ्या भावाने वस्तू विकणा-या दुकानदारांवर वचक बसला. व रस्त्यावरील गर्दी् कमी झाल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होत आहे. या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
अहोरात्र झटले प्रशासन-
बारामती उपविभागात टाळेबंदीच्या काळात प्रशासन, आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेतल्याने उपविभागात करोनाचा अधिकचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही. पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवुन वेळोवेळी कारवाईया सुरू ठेवल्याने विनाकारण घराबाहेर फिरणा-यांची संख्या कमी झाली.
बारामती उपविभागाने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाईया करून प्रशासनाच्या मदतीने कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. तसेच अवैध धंद्यावर ही कारवाई करून अवैद्य धंदे नेस्तनाबुत केले आहेत. व ही कारवाई पुढेही चालू राहणार आहे.
नारायण शिरगावकर- ( उपविभागीय पोलिस अधिकारी.बारामती)