जुलैमध्ये सुरू होणार होती माध्यमिक शाळा : करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे निर्णय लांबणीवर
पिंपरी – शहरातील करोनाचा संसर्ग वाढतच चालल्यामुळे जुलै मध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवरच पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने मागील काही दिवसापूर्वी परिपत्रक काढून माध्यमिक विभागातील म्हणजे इयत्ता नववी व दहावीचे वर्ग जुलै महिन्यात सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याची तयारीही केली होती.
मात्र, मागील काही दिवसात शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने जुलै महिन्यात शाळा सुरु करणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे, जुलैमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, शाळांची घंटा वाजण्यासाठी पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
शासनाने 1 जुलैपासून टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जुलै मध्ये इयत्ता 9 वी, 10 वी व 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार होते. शासनाचा हा निर्णय आल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी सुरु केली होती. त्यानुसार, शाळाची स्वच्छता व निर्जुंतुकीकरण करणे, शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अहवाल मागवणे, याबरोबरच पालकांची शाळा सुरु करण्याला अनुमती आहे का? याची चाचपणीही करण्याचे काम सुरु होते. या सर्व कामाचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यातही आला होता. मात्र, मागील आठवडाभरात पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे शाळा सुरु करण्याला पालकांसह काही शिक्षकांनीही विरोध केला आहे.
तसेच सद्य परिस्थितीत शाळा सुरु करणे धोकादायक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे, पुणे शिक्षण संचालकांनी सध्यस्थितीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक दिला आहे. त्यामुळे, सद्यस्थितीत शहरातील शाळा सुुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ऑनलाइन शिक्षणावरच मदार
नववी व दहावीचे वर्ग जुलै महिन्यात सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच शाळा सुरु होणार असल्यामुळे आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच भर द्यावा लागणार आहे. सध्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. पुढेही शाळा सुरु होईपर्यंत याच पद्धतीने शिक्षण दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगीतले.
शासनाचे परिपत्रक आल्यानंतर जुलै महिन्यात नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु केली होती. मात्र शहरात काही दिवसांपासून करोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये शाळा सुरु करणे शक्य नाही. याबाबत पुणे येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत सध्या तरी शाळा सुरु करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल.
– पराग मुंडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग