गणेश घाडगे
ग्रामपंचायतीच्या गाळ्यातच चालतो खुलेआम जुगार
नेवासा – जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांची बदली होताच नेवासा तालुक्यात खलेआम अवैध धंदे फोफावले आहेत. माका हे शेवगाव-पंढरीपूल या रस्त्यावर असून, शेवगाव-पाथर्डी-नेवासा या तीन तालुक्यांच्या सीमेवरती असल्याने हे गाव अवैध धंद्यांचे माहेरघरच बनले आहेत. येथे चक्क ग्रामपंचायतीच्या गाळ्यातच खुलेआम जुगार सुरू असतो. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माका येथे परिसरातील आठ ते दहा गावांचा दैनंदिन संपर्क असल्याने बाजारपेठेत कायमच वर्दळ असते. याठिकाणी चक्क ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचेच अवैध धंदे असून, सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी फक्त आठवडे बाजारच्या दिवशी हजेरी लावून निघून जातात. अनेकदा अवैध धंद्यांची माहिती देऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात. जर कारवाई केलीच, तर आर्थिक तडजोड करतात, अशी चर्चा परिसरात आहे. आता तर गावात ऑनलाइन मटका, जुगार, मटका धुमधडाक्यात चालू आहे. त्यामुळे येथील महिलांची कुचंबणा होत आहे.
बसस्थानक, मराठी शाळेच्या अवतीभोवती दारू, मटका व जुगार खुलेआम सुरु आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातच खुलेआम जुगाराचा अड्डा चालवला जात आहे. त्यामुळे तेथे परिसरातील गावांतील जुगार खेळणाऱ्यांची कायम वर्दळ असते.
तसेच गावात यात्रेतील हगाम्यासाठी स्वतंत्र ओट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेही मद्यपी कायमच लोळत असतात. या अवैध धंद्यांना कुणाचे अभय आहे, अशी चर्चा सुरू आहे.
या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार मोडले आहेत. तरुण पिढी व्यसनाधिन झाली आहे. त्यामुळे या धंद्याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन डोळेझाक का करत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गावात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याने माका हे गाव जणू अवैध धंद्यांचे माहेरघर बनले असल्याचीच चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. याकडे आता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.