राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सर्वोच्च प्राधान्य – अनिल देशमुख

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकारचे कायम प्राधान्य राहिले आहे. कायद्याची चाैकट मोडणाऱ्या दोषींवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम 260 अन्वये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकारने कायम प्राधान्य दिले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षात वाढ झालेली नसल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्था (एनसीआरबी) च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

मुंबईतील अँटिलिया या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एन आयए) करीत आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबासंदर्भातील तपास हा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करीत आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून अन्यत्र बदली करण्यात आली आहे. कुणालाही पाठीशी घालणार नसून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुका ह्या शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जवेली खुर्द येथे गेल्या 54 वर्षांत पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत. गडचिरोलीतील 535 गावांच्या 325 ग्रामपंचायतींसाठी शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पडल्या असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, सुरेश धस, महादेव जानकर, विनायक मेटे, डॉ.परिणय फुके, अमोल मिटकरी, गोपिकिशन बाजोरिया, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे यांनी भाग घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.