फुफ्फुसाच्या कर्करोगाचं लक्षण

कॅन्सरशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही

जगभरातच फुफ्फुसाशी संबंधित विकारांमध्ये वाढ होत चालली आहे. भारतही याला अपवाद नाही. वाढतं प्रदूषण आणि धूम्रपान ही अस्थमा, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे विकार जडण्याची दोन प्रमुख कारणं आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे धूम्रपान न करणार्‍यांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं पटकन लक्षात येत नाहीत. या विकाराचं निदान प्राथमिक टप्प्यात झालं तर उपचार करणं शक्य होतं. फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. म्हणूनच फुफ्फुसाच्या कॅन्सरशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही. या विकाराच्या प्रमुख लक्षणांची माहिती घेऊ.

सर्वसाधारण खोकला आठवड्याभरात बरा होतो. मात्र काही वेळा बराच कालावधी लोटल्यानंतरही खोकला बरा होत नाही. अशा वेळी तपासणी करून घेणं योग्य ठरतं. बराच काळपर्यंत टिकणारा कोरडा खोकला, खोकताना रक्त पडणं अशी लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चालताना, बोलताना किंवा नेहमीची कामं करताना अचानक धाप लागायला लागली तर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं लक्षणं असू शकतं. धाप लागण्याला वैद्यकीय भाषेत डिस्पिया असं म्हटलं जातं. फुफ्फुसात तयार झालेली गाठ वाढल्यानंतर हवेच्या पोकळ्यांमध्ये अडथळे आल्याने धाप लागू शकते.

फुफ्फुसाचा कर्करोग शरीरात पसरू शकतो. हा विकार हाडांमध्ये पसरला तर पाठदुखी जाणवू शकते. यासोबतच इतर अवयवांमध्येही वेदना जाणवतात. अनेकदा लोकांना स्नायू आणि हाडांमधल्या वेदनांमधला फरक करता येत नाही, पाठदुखीकडे दुर्लक्ष होतं. यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं वेळेत निदान होऊ शकत नाही. हाडांचं दुखणं रात्रीच्या वेळी तीव्र स्वरुप धारण करतं. तसंच हालचाल केल्यावर अधिक वेदना जाणवतात.

कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी झालं तर त्याचा संबंध फुफ्फुसाच्या कर्करोगाशी जोडला जातो. शरीरातल्या कर्करोगग्रस्त पेशींमुळे वजन वेगाने कमी होतं. म्हणूनच कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता महिन्याभरात पाच किलो वजन कमी झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.