थिरुवनंतपुरम : गेल्या काही कालावधीमध्ये भारतासह जगात सर्वत्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील पहिली एआय शिक्षिका केरळमधील एका शाळेमध्ये दाखल झाली आहे. पूर्ण भारतीय पेहरावात म्हणजेच साडीमध्ये सादर करण्यात आलेल्या या भारतीय शिक्षिकेचे नाव आयरिस असे ठेवण्यात आलंय.
केटीसीटी या शाळेमध्ये या एआय शिक्षिकेचा प्रवेश होताच विद्यार्थ्यांनाही खूप आनंद झाला. कारण या शिक्षिकेने विद्यार्थ्यांशी तीन भाषेमध्ये संवाद साधला. भारत सरकारच्या अटल टिंकलिंग लॅब या योजनेच्या माध्यमातून मेकरलॅब्स एज्युटेक कंपनीने या एआय शिक्षिकेची निर्मिती केलीय. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय.
विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता या शिक्षिकेमध्ये आहे. चॅट जीपीटी सारख्या प्रोग्रामिंग व्यासपीठाचा वापर करून आयरिस या शिक्षिकेची रचना करण्यात आलीय. आयरीस नावाची ही एआय शिक्षिका चार पायांवर चालते. तिच्या गळ्यामध्ये एक हार दिसतो जी प्रत्यक्षात एक मायक्रोफोनची वायर आहे.
विद्यार्थ्यांना नेहमीच अवघड वाटणाऱ्या गणित आणि विज्ञान या दोन विषयांचा अभ्यास अधिक सुलभ करून दाखवण्यासाठी प्राधान्याने आयरिसचा वापर करण्यात येणार आहे. या शाळेतील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतरही काही शाळांमध्ये अशा प्रकारे अटल टिंकलिंग लॅब योजना अंतर्गत ए आय माध्यमातून शिक्षिका पाठवण्यात येणार आहेत.