कोरेगावमधून जोरदार शक्तिप्रदर्शनाने
कोरेगाव – भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश शिंदे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीन माजी खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरेगाव बाजार समितीच्या मैदानावर सकाळी 10 पासून हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते, शिवसैनिक जमू लागले. दुपारी 1 च्या सुमारास शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, नितीन बानुगडे, सुनील खत्री यांच्या उपस्थितीत रॅली सुरू झाली.
रॅलीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मार्केट यार्ड, जळगाव नाका, आझाद चौक, हुतात्मा स्मारक, साखळी पूल, जुना मोटार स्टॅंड मार्गे रॅली तहसील कार्यालय परिसरात दाखल झाली. तेथे उदयनराजे व नरेंद्र पाटील रॅलीमध्ये सामील झाले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज शिवसेनेचे नेते महेश शिंदे यांनी तहसीलदार रोहिणी शिंदे यांच्याकडे सादर केला.