पिंपरी (प्रतिनिधी)- भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-मोशी- चऱ्होली- डुडूळगाव- जाधववाडी आदी समाविष्ट गावांतील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्या निकालात काढण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. रस्ते, पाणी आणि वीज यासंदर्भात विविध सोसायट्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत.
मोशी आणि परिसरातील समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे.
नव्याने नागरीकरण झालेल्या भागात पाणी, वीज आणि अंतर्गत रस्त्यांच्या रखडलेल्या कामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. याबाबत आमदार लांडगे यांनी ज्या ठिकाणी समस्या आहे. त्याच ठिकाणी जागेवर जावून महावितरण, महापालिका अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली.
यावेळी माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सचिव प्रकाश जुकंटवार, लक्ष्मीमंत बोंडे, धीरज सिंग, अमोल बांगर, महावितरणचे अधिकारी उमेश कवडे, रमेश सूळ, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, दिनेश पाठक, अनिल ईदे, स्थापत्य विभागाचे अनिल शिंदे, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच, रखडलेली विकासकामेही मार्गी लागतील.