चेन्नई – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतर याही स्पर्धेला रामराम करणार आहे. त्यानंतर टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी तो भारतीय संघाच्या मेंटॉरपदी कार्यरत राहणार असून, त्यानंतर कदाचित तो पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाचा प्रशिक्षक म्हणून दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएल स्पर्धेतील धोनीचे हे अखेरचे वर्ष असून, धोनीची गेल्या दोन वर्षांतील आयपीएलमधील कामगिरीही सुमार होत आहे.
यंदाच्या स्पर्धेतही त्याची बॅट शांत आहे. त्याने गेल्या वर्षी 14 सामन्यांत 200 धावा केल्या होत्या आणि यावर्षी 10 सामन्यांमध्ये केवळ 50 धावाच त्याला करता आल्या आहेत.
धोनीचे वय आता त्याच्यावर वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळेच चाळीशीत आलेला धोनी सातत्याने अपयशी ठरत आहे. भारतीय संघासाठी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत मेंटॉरपदी नियुक्ती झालेला धोनी पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाचा मुख्य प्रशिक्षकही बनण्याची शक्यता आहे.