आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम सुरु झाला तेव्हाच अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली. या स्पर्धेत खेळत असलेले कधीकाळचे मॅच विनर खेळाडू आता कशी कामगिरी करत आहेत. त्यांचा आता संघाला काही उपयोग आहे का, त्यांनाच का सातत्याने निवडले जाते व नवोदितांकडे दुर्लक्ष का केले जाते, हे व असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
खरेतर या विषयाला हात घालताना जरा संभ्रम निर्माण झाला होता, कारण भारतात भूतकाळात केलेल्या कामगिरीच्या जोरावर पुढील कित्येक काळ भारतीय संघातील जागा उबवणारे खेळाडू आपण पाहिले आहेत. आज तोच प्रकार आयपीएल स्पर्धेतही सुरु झाला दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन याने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच यंदाच्या स्पर्धेतील काही खेळाडूंनीही निर्णय घ्यावा असे वाटते.
महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्ज, रॉबिन उथप्पा, सुनील नरेन, शिखऱ धवन, मनीष पांडे, विजय शंकर, प्रदीप संगवान, मनन व्होरा, केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, कार्तीक त्यागी, करुण नायर, डेव्हीड मिलर, वृद्धिमान साहा, जयंत यादव या व यांसारख्या खेळाडूंनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपले वय झाल्याची जाणीव करुन द्यायला सुरुवात केली आहे. यातील धोनी, उथप्पा किंवा अन्य काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघाकडून विक्रमांचे इमले रचले आहेत. हे खेळाडू मोठे किंवा महानही संबोधले जातात पण प्रत्येकाचा काळ केव्हातरी संपुष्टात येतो आणि ते वेळेवर ज्याला समजले तो महान ठरतो.
धोनीने भारतीय संघाला विश्वकरंडक जिंकून दिला, बेस्ट फिनिशर म्हणून आपले यश साकार केले. मात्र, आता यंदाच्या स्पर्धेत ज्या पद्धतीने तो मैदानावर वावरताना दिसत आहे ते पाहता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जशी 2019 साली निवृत्ती घेतली तसाच निर्णय त्याने आयपीएल स्पर्धेतूनही घ्यावा व याच वर्षीच्या मोसमानंतर घ्यावा असेच वाटते. जी धोनीची स्थिती आहे तीच थोड्याफार फरकाने उथप्पासह अनेक खेळाडूंची आहे.
धावंसाठी झगडताना कोणताही फलंदाज दिसला की त्यापेक्षा त्याने थांबलेले चांगले असेच सांगावेसे वाटते. यातील खेळाडू केवळ भारताचेच आहेत असे नाही तर पोलार्ड, नरेन, एल्गर हे परदेशी संघातील खेळाडू देखील फॉर्म गमावून बसले आहेत. सध्या अनेक खेळाडू त्यांच्या देशाच्या संघांचे ओझे बनले आहेत मग तोच भार पूर्णपणे व्यावसायीक अशा आयपीएल स्पर्धेतील संघांनी तरी का वाहावा. त्यापेक्षा नवोदितांना संधी मिळावी यासाठी योग्य वेळी थांबलेले चांगले ठरेल.