Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मागील आठवड्यात आपला फॉर्म्युला जाहीर केला. यात शिवसेनेला (ठाकरे गट) 21, कॉँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला (पवार गट) 10 जागा देण्याचे निश्चित करण्यात आल्या. मात्र महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील जागांवर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही.
मविआकडून नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक मतदारसंघातून महायुतीच्या तीनही पक्षातील नेत्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. यातच महायुतीकडून नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, भाजपचे दिनकर पाटील आणि राहुल ढिकले, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
नाशिक लोकसभा मतदार संघ Lok Sabha Election 2024|
नाशिक लोकसभेत सिन्नर, देवळाली, इगतपुरी, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम हे सहा मतदारसंघ येतात. 2019 ला नाशिकची लोकसभा शिवसेनेच्या हेमंत गोडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांमध्ये झाली होती. गोडसेंना 5,63,599 तर भुजबळांना 2,71,395 मतं पडली होती. गोडसेंनी 2 लाख 92 हजार मतांनी समीर भुजबळांचा पराभव केला होता.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ Lok Sabha Election 2024|
संभाजीनगरात ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आलीय. तर एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात आहेत. मात्र, महायुतीकडून संदीपान भुमरे आणि भागवत कराडांच्या नावाची चर्चा आहे. 2019 मधील संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 3,89,042 आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 3,84,550, अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798 मतं पडली. यात 4 हजार 492 मतांनी जलील यांचा विजय होऊन त्यांनी खैरेंना पराभूत केले होते.
दरम्यान, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मुंबई दक्षिण, ठाणे आणि सातारा या जागांचा देखील तिढा अद्याप सुटलेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक असून तसा त्यांनी दावाही केला होता. मात्र नंतर भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर जोर दिला जात असल्याने सामंत यांच्याकडून ही जागा सोडण्यात आल्याचे समाजमाध्यमांवर जाहीर करण्यात आले. तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचे नाव चर्चेत आहेत. आता या जागांवर महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा
“रात्री झोप लागण्यासाठी त्यांनी एक पेग…” ; भाजप नेत्याची काँग्रेसच्या महिला मंत्र्यावर अश्लाघ्य टीका