Nashik Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. नाशिक लोकसभेसाठी (Nashik Lok Sabha Constituency) पाचव्या टप्प्यात 20 मेला मतदान होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महायुतीकडून अद्याप या ठिकाणी कोणत्याही नावाची घोषणा करण्यात आली नाही.
नाशिकच्या जागेवर शिंदे गट (Shinde Group), अजित पवार गट (Ajit Pawar Group) तसेच भाजप (BJP) अशा महायुतीतील (Mahayuti) तीनही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे येथील तिढा अद्याप जैसे थे आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे(MP Hemant Godse) यांचे नाव नाशिक लोकसभेसाठी जाहीर केले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या नावाची देखील चर्चा सुरु झाली.
मात्र आता या दोघांच्याही नावाला विरोध होत असल्याचे पाहून महायुतीने याठिकाणी दोन्ही नावांना बाजूला सारून तिसऱ्याच नावाची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये नाशिक पूर्वचे भाजप आमदार राहुल ढिकले (BJP MLA Rahul Dhikle) आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांची नावे नाशिक लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आली आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांना विरोध होत असल्याने महायुतीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता महायुतीकडून हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त कोणता पर्यायी उमेदवार विजयी होऊ शकतो, याबाबत चाचपणी सुरु आहे. संघाकडून इतर उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यापार्श्वभूमीवर नवीन चर्चेत असलेल्या आमदार ढिकले आणि जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमदार राहुल ढिकले म्हणाले, माझ्याबाबतीत सर्व्हे चालू आहे या विषयी मला माहिती नाही. जागा भाजपला सुटावी, अशी आम्ही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी गिरीश महाजन जे निर्णय घेतील तो मान्य असेल. महायुतीचा उमेदवार सक्षम असणार तो निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले की, मी उमेदवारी मागितली नाही. जागा शिवसेनेला मिळावी ही आमची आजही मागणी आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी ही मागणी आहे. या आधी दोन निवडणुकीत हेमंत गोडसे यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम केले आहे. शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जे आदेश देतील त्याचे पालन करू, असे त्यांनी म्हटले आहे. आता महायुतीतून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.