पिंपरी – महावितरणचे पेमेंट अपडेट करण्याच्या नावाखाली एका निवृत्त शिक्षिकेची 10 लाख 30 हजार 920 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना सांगवी येथे घडली.
याबाबत 53 वर्षीय महिलेने बुधवारी (दि. 6) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9907496946 या फोनवरील अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेचे सांगवी येथे घर असून त्या ठिकाणी त्यांची बहिणही राहण्यास आहे. तर ठाणे येथे भाऊ राहण्यास असून फिर्यादी महिला दोन्हीकडे राहत आहे. त्यांचे दोन महिन्याचे लाइट बील थकले होते.
3 ते 5 जुलै रोजी फिर्यादी महिला सांगवी येथे असताना त्यांना आरोपीने फोन केला. महावितरणचे पेमेंट अपडेट करायचे आहे, असे सांगून त्यांना क्विक सपोर्ट ऍप व एनी डेस्क ऍप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा स्क्रीन शॉर्ट शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या बॅक खात्यावरील 10 लाख 30 हजार 920 रुपये ऑनलाइन काढून फिर्यादी महिलेची फसवणूक केली.