प्रत्येक घरटी रुग्ण असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडून उपाययोजाना सुरू
वाल्हे – मागील आठवड्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने वाल्हे (ता. पुरंदर) येथे “व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी संपूर्ण गावामध्ये रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
वाल्हे परिसरात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असून मध्येच कधीतरी अधूनमधून पावसाच्या रिमझिम धारा यामुळे दिवसभर उष्णता तर सायंकाळी थंडगार वारा यामुळे वाल्हे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली आहे. गवत, चिखलामुळे, डासांचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी साथीच्या आजाराने सर्वत्र हात पाय पसरले असून, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिंका सारखे आजार होण्याची भीती निर्माण होत असून सध्या घरटी एकातरी रुग्णास सर्दी किंवा तापाची लक्षणे आढळून येत आहे.
या सर्व्हेमध्ये आरोग्य सेवक कैलास भोसले, विजय जगताप, रामदास वाघोले, निखील दोडके, गटप्रवर्तक वैशाली दानवले, आशा स्वयंसेविका रोहिणी पवार, ज्योती पवार, सविता दुर्गाडे, ज्योती महांगडे आदि आशा स्वयंसेविका तपासणी करीत असल्याची माहिती पर्यवेक्षिका संजीवनी दरे यांनी दिली.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र व वाल्हे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने परिसरामध्ये घरोघरी जाऊन त्याच्या परिसरातील साचलेल्या पाण्याची तपासणी करण्यात आली व जंतूनाशक पावडर टाकण्यात आले. तसेच घरातील लोकांची जनजागृती करून साठवणूक केलेले पाणी ओतून देण्यात आले.
– डॉ. प्रशांत आंधळे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाल्हे
हवामानातील बदलामुळे गावामध्ये पसरलेल्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने औषध व धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे.
– अमोल खवले, सरपंच