‘काली’ या माहितीपटाच्या वादात दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई सतत ट्विट करत असून त्यामुळे आता हा वाद वाढत आहे. लीना यांनी भाजपची खिल्ली उडवली असून भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही, असं म्हंटल आहे. लीना यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
भाजप ट्रोल आर्मीला माहित नाही की कलाकार त्यांच्या परफॉर्मन्सनंतर स्वतःला कसे शांत करतात. हे माझ्या चित्रपटातील नाही. दैनंदिन ग्रामीण भारतातिलच हे आहे. संघ परिवाराला त्यांच्या अखंड द्वेषाने आणि धार्मिक कट्टरतेने नष्ट करायचे आहे. हिंदुत्व कधीच भारत होऊ शकत नाही.
मला कुठेही सुरक्षित वाटत नाही
याआधी, ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेली मुलाखत शेअर करताना लीना मनिमेकलाई यांनी ट्विटरवर लिहिले की, “असं दिसतंय की संपूर्ण देश जो सगळ्यात मोठी लोकशाही होता तो आता द्वेषाचे मशीन झाला आहे आणि त्यांना मला सेन्सॉर करायचे आहे. मला सध्या कुठेही सुरक्षित वाटत नाही.”
खरं तर, तिच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये देवी धूम्रपान करत असल्याचे आणि एलजीबीटीक्यू ध्वज हातात घेतल्याने दिग्दर्शक लीनाविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी लीनाने सांगितले होते की, गेल्या आठवड्यात वाद सुरू झाल्यापासून तिला, तिचे कुटुंबीय आणि सहकारी यांना दोन लाखांहून अधिक ऑनलाइन धमक्या आल्या आहेत. दिग्दर्शिकेने या ऑनलाइन धमक्यांची तुलना उजव्या विचारसरणीच्या हिंदू गटांद्वारे मॉब लिंचिंगच्या घटनांशी तुलना केली आहे.
त्यांनी ट्विट करून लिहिले, “ट्विटर इंडिया 2,00,000 द्वेष करणाऱ्यांचे ट्विट थांबवेल का ? या लो लाइफ ट्रोलर्सनी तेच पोस्टर ट्विट करून पसरवले जे त्यांना आक्षेपार्ह वाटले. कालीला मारता येत नाही. कालीवर बलात्कार होऊ शकत नाही. काली नष्ट होऊ शकत नाही. ती मृत्यूची देवी आहे.”
या वादानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरही धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, महुआ मोइत्रा म्हणाली होती, “तुम्ही माँ कालीला कोणत्या रूपात घ्याल हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्यासाठी आई काली ही मांसाहार करणारी आणि दारू पिणारी देवी आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर माझा कोणताही आक्षेप नाही.”