सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार चुरशीचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीने शरद पवार समर्थक शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे.
त्यांच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिलेदार सक्रिय झाले असून महाविकास आघाडीचा उमेदवार पूर्ण ताकतीने निवडून देण्याची ग्वाही जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली
करहर, ता. जावळी येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, शिवसेना पदाधिकारी सादिक बागवान, महिला संघटक सुनंदा महामुलकर, तालुकाप्रमुख नितीन गोळे, उमेश दुर्गवळे, प्रकाश गोळे, रवी पत्रे, सारिका गुजर, युवासेना अध्यक्ष जीवन शिंदे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला आहे त्याचा पूर्ण ताकतीने प्रचार करावयाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. असे मोहिते यांनी सांगितले. ही सर्व प्रचार यंत्रणा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबणार आहे.
शिवसेनेच्या वतीने प्रचारमेळावे, घरटी संपर्क अभियान, त्याचबरोबर उद्धव ठाकरे सरकारने गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच प्रत्येक मतदार संघामध्ये बूथ लेवलपर्यंत काम करून त्याचे सशक्तिकरण मजबुतीकरण तसेच सेना सभासदांची संख्या वाढवणे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने साताऱ्यात भव्यशक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने यामध्ये हिरीरीने भाग घेतला होता. यापुढे महाविकास आघाडीच्या सर्व प्रचार मोहिमांमध्ये आम्ही अग्रभागी राहणार असल्याचे आश्वासन सचिन मोहिते यांनी दिले आहे.