पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे बार असोसिएशन निवडणुकांवेळी मतदार यादीबाबत घोळ होतात. ते टाळण्यासाठी, प्रॅक्टिस करत असलेले, नसलेले वकील शोधणे आवश्यक आहे. तसेच वकिलांच्या हितासाठी राबविण्यात येणार्या योजनांचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व वकिलांची सनद आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
वकिलांच्या नावांची सुधारित यादी तयार करत त्यांची नोंदणी करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि गोवा वकील परिषदेने ही मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी दि. ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पातळीवर असलेल्या बार असोसिएशनला याबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिषदेकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वकिलांच्या कागदपत्रांची तपासणी करून घेत त्यांची असोसिएशनसाठी नोंदणी करून घेतली जात आहे.
३० एप्रिलपर्यंत ही पडताळणी पूर्ण करण्यात येणार होती. मात्र, वकीलांकडून मुदत वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. त्याबाबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर यांनी महाराष्ट्र राज्य आणि गोवा वकील परिषदेकडे मुदत वाढवून देण्याची विनंती केली.
त्यानंतर परिषदेने दि. 30 जूनपर्यंत मुदत वाढविली. गेल्या पाच वर्षांपासून प्रॅक्टिस करत असलेले आणि पाच वर्षांच्या आतील प्रॅक्टिस असलेले वकील अशा दोन टप्प्यांत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वकिलांची सदस्य म्हणून नोंदणी केली जात आहे.