सातारा, (प्रतिनिधी) – ‘हर हर महादेव’, ‘जय शिवशंकर’च्या घोषात जिल्ह्यातील महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्री धार्मिक आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरांमध्ये रूद्राभिषेक, महाभिषेक, पंचोपचार पूजा, कीर्तने, प्रवचने, महाआरती आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक कोटेश्वर मंदिर,
मंगळवार तळ्यानजीक गणकेश्वर, बहुलेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, कृष्णेश्वर मंदिर, यादोगोपाळ पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिर, गुरुवार पेठेतील कमानी हौद परिसरातील राजराजेश्वर मंदिर, योगेश्वर मंदिर, माची पेठेतील मुद्गलेश्वर मंदिर खिंडीतील गणपती परिसरातील कुरणेश्वर मंदिर, संगम माहुलीतील काशी विश्वेश्वर मंदिर, माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर आणि सज्जनगडावरील समाधी मंदिरात भाविकांची गर्दी होती.
कृष्णानगर येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात पहाटे शंकराच्या पिंडीला जलाभिषेक व पंचामृत अभिषेक करण्यात आला. बिल्वपत्रे व धोत्र्याच्या फुलांनी मंदिर सुशोभित करण्यात आले होते. रूद्र अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. वेदमूर्ती दत्तशास्त्री जोशी, रोहित आपटे, ओमकार देशपांडे, अविनाश वाळिंबे, अनिरुद्धशास्त्री गुमास्ते, श्रेयस भिसे, पार्थ जोशी, आदित्य कुलकर्णी, सागर पाटील, प्रमोद कुलकर्णी, वेदांत देशमुख, उमामहेश्वर वेदपाठशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.