सातारा, (प्रतिनिधी) – बांधकाम विश्वातील सर्वोच्च संस्था बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेतर्फे पोलीस करमणूक केंद्राच्या अलंकार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घरकुल मेळाव्याचा शुभारंभ शुक्रवारी स्टेट बँकेच्या चीफ क्रेडिट मॅनेजर आकांक्षा भूमिवाल यांच्या हस्ते दिमाखात झाला.
कंग्राळकर असोसिएटस्चे श्रीधर कंग्राळकर, बिल्डर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष सचिन देशमुख, सातारा शाखेचे अध्यक्ष अनिल दातीर, सचिव कौस्तुभ मोरे, उपाध्यक्ष सुधीर ठोके, खजिनदार हर्षद वालावलकर व पदाधिकारी उपस्थित होते. हा मेळावा रविवार, दि. 10 पर्यंत सकाळी 10 ते 9 या वेळेत होणार आहे. आकांक्षा भूमिवाल म्हणाल्या, स्टेट बँक आणि बीएआयचे नाते अतूट आहे.
बीएआय विविध उपक्रमांमधून वैविध्य जपत आहे. या घरकुल मेळाव्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी घरांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. श्रीधर कंग्राळकर यांनी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. असे मेळावे अन्य शहरांमध्येही आयोजित करावेत, असे ते म्हणाले. सचिन देशमुख म्हणाले, बीएआयची सातारा शाखा आपल्या अनोख्या उपक्रमांनी देशभरात कौतुकास पात्र ठरत आहे. ही शाखा केवळ सभासदांसाठी नव्हे, तर समाजासाठीही अनेक उपक्रम वर्षभर राबवत असते. घरकुल मेळाव्याला सातारकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील.
या मेळाव्यात जिल्ह्यातील व अन्य ठिकाणचे नामवंत बिल्डर्स, डेव्हलपर्स, वित्तीय संस्थांचे आणि अन्य साहित्याचे 50 स्टॉल्स सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात नागरिकांच्या बजेट व लोकेशननुसार पर्याय आणि त्वरित कर्ज सुविधा वित्तीय संस्थांकडून मिळणार आहेत. शहराच्या चारही दिशांना असलेले रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि प्लॉटिंग प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
या मेळाव्याला भेट देऊन, आपल्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवावे, असे आवाहन अनिल दातीर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शंभूराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कौस्तुभ मोरे यांनी आभार मानले.