पिंपरी – बहुजन समाज पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या राष्ट्रीय अधक्षा मायावती यांच्या प्रमुख उपस्थितीत लखनऊ येथे प्रदेश पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश कार्यकारिणी बर्खास्तीनंतर नांदेड येथील अॅड. परमेश्वर गोणारे यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणेला अध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर, त्याची उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर फक्त मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्रदेश महासचिव म्हणून अॅड. सुनील डोंगरे (विदर्भ), मनीष कावळे (मराठवाडा), डॉ प्रशांत इंगळे (खानदेश), डॉ. हुलगेश चलवादी (पश्चिम महाराष्ट्र यांची निवड केली. ह्यांना त्या-त्या विभागातील 12-12 लोकसभेचा प्रभार देऊन त्यांच्या सोबतीला दोन-दोन प्रदेश सचिव सुद्धा दिले. व त्या तिघांनाही संयुक्तरीत्या काम करण्याचे समान निर्देश दिले.
प्रदेश प्रभारी म्हणून राष्ट्रीय सन्वयक व माजी खासदार रामजी गौतम व नितीन सिंग यांच्यावर स्वतंत्ररित्या जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे प्रभारी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अॅड. गणोरे यांना घेऊन राज्यभर संघटन बांधणीचा दौरा करतील व अन्य पदाधिकारी आपआपल्या झोनमध्येच पक्ष कार्य करतील, अशाही प्रामुख्याने सूचना देण्यात आल्या.
अॅड. सुनील डोंगरे यांची प्रदेश महासचिव पदी, इंजिनिअर दादाराव उईके (वर्धा) व पृथ्वीराज शेंडे (नागपूर) यांची प्रदेश सचिवपदी निवड करून या तिघांवरही विदर्भाची सामूहिक जबाबदारी दिली आहे. हे तिघेही विदर्भातील बारा लोकसभेचा व पक्षकार्याचा कार्यभार सांभाळतील.