मुंबई :- अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह NCP च्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
सध्या सर्वत्र राज्याच्या राजकारणाविषयी चर्चा रंगत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रा वाघ यांनी ‘योग्य वेळी योग्य निर्णय…’ असं ट्विट करत अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच या सर्वांसह सुनिल तटकरे यांना देखील टॅग केलं आहे. तसेच या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करताना स्वागत देखील केलं आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.