Mahrashtra Politics : देशाचं राजकरण असो वा राज्यातील राजकारण घराणेशाही हा विषय सर्वच पक्षांत पाहायला मिळतो. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचार मुद्द्यांमध्ये महत्वाचा मुद्दा हा घराणेशाहीचा होता ज्यावरून स्वतः पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांवर थेट निशाणा साधला होता. ज्याचा चांगलाच फायदा भाजपला झाला होता. नुकतच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता घराणेशाहीवर भाष्य करत तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होत. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बाप मंत्री तर मुलगा खासदार किंवा बाप आमदार तर मुलगा किंवा मुलगी जिल्हाध्यक्ष असा गोतावळा अगदी सहजतेने पाहायला मिळतो. सध्या राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये नेमकी कशी घराणेशाही आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत घराणेशाहीवर बोलले आहेत. पंतप्रधानांनी घराण्यावर बोलू नये. तुम्ही आमच्या घराण्यावर बोलाल, तर आम्हीही तुमच्या घराण्यावर बोलू. घरांदाज असलेल्यांनी घराणेशाहीवर बोलावं. घरंदाज नसलेल्यांनी घराणेशाहीवर बोलू नये. घराण्याची परंपरा काय असते, हे मोदींना माहिती नाही. त्यामुळे आजपर्यंत मदत करत आलेली ठाकरेंची घराणेशाही मोदींना नकोशी झाली आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले,”आता गद्दरांची घराणेशाही मोदींना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. गद्दारी आणि घराणेशाही लोकसभेत नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार आहे. काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. कारण, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधरायची आहे. मीही सुधारणार आहे.”
महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबात असलेली घराणेशाही
सत्ताधारी
गंगाधरपंत फडणवीस (नागपूर पदवीधर आमदार) – देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री (मुलगा) – शोभाताई फडणवीस,माजी मंत्री (देवेंद्र यांच्या काकू)
पांडुरंग फुंडकर (भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ) आकाश फुंडकर,आमदार (मुलगा)
नारायण राणे,केंद्रीय मंत्री – नितेश राणे,आमदार (मुलगा), निलेश राणे,माजी खासदार (मुलगा)
विजयसिंह मोहिते-पाटील,माजी उपमुख्यमंत्री – प्रतापसिंह मोहिते-पाटील (मुलगा),रणजीतसिंह मोहिते पाटील (मुलगा)
रामप्रसाद बोर्डीकर,माजी आमदार – मेघना बोर्डीकर-साकोरे,आमदार (मुलगी)
रामराजे नाईक निंबाळकर,वि.प.सभापती – राहुल नार्वेकर,आमदार (जावई)
राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री – सुजय विखे पाटील,खासदार (मुलगा)
रवी राणा,आमदार – नवनीत राणा,खासदार (पत्नी)
रावसाहेब दानवे,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री – संतोष दानवे,आमदार (मुलगा)
पंकजा मुंडे,माजी मंत्री – प्रीतम मुंडे,खासदार (बहीण)
विजयकुमार गावित,मंत्री – सुप्रिया गावित, हिना गावित (मुली)
हर्षवर्धन पाटील,माजी मंत्री – अंकिता पाटील,जिल्हा परिषद सदस्य (मुलगी)
उपमुख्यमंत्री अजित पवार – पार्थ पवार,सक्रिय राजकारण (मुलगा)
सुनील तटकरे – आदिती तटकरे (मुलगी),अनिकेत तटकरे (मुलगा,आमदार विधानपरिषद)
छगन भुजबळ – पंकज भुजबळ (मुलगा) समीर भुजबळ (पुतणे)
एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) – श्रीकांत शिंदे (मुलगा)
यशवंत जाधव (मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ) – यामिनी जाधव,आमदार (पत्नी)
रामदास कदम,माजी मंत्री – योगेश कदम,आमदार (मुलगा)
निवेदिता ,माने, माजी खासदार – धैर्यशील माने,खासदार (पुत्र)
सुभाष देसाई – भूषण देसाई (मुलगा)
विरोधक
उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री – आदित्य ठाकरे,माजी मंत्री (मुलगा)
संजय राऊत,खासदार -सुनील राऊत,आमदार (भाऊ)
अशोक चव्हाण – अमिता चव्हाण,माजी आमदार (पत्नी)
सुशील कुमार शिंदे,माजी केंद्रीय मंत्री – प्रणिती शिंदे,आमदार (मुलगी )
सतेज पाटील आमदार – ऋतुराज पाटील आमदार (पुतणे)
विलासराव देशमुख,माजी मुख्यमंत्री – अमीत आणि धीरज देशमुख,आमदार (मुले)
बाळू धानोरकर,खासदार – प्रतिभा धानोरकर,आमदार (पत्नी)
पतंगराव कदम,काँग्रेस दिवंगत नेते – विश्वजित कदम,आमदार (मुलगा)
विजय वडेट्टीवार – शिवानी वडेट्टीवार
बाळासाहेब थोरात – सत्यजित तांबे,आमदार (भाचा)
शरद पवार,खासदार – सुप्रिया सुळे,खासदार (मुलगी), अजित पवार (पुतणे) – रोहित पवार (नातू)
बबनराव शिंदे – संग्राम थोपटे (जावई )
एकनाथ खडसे – रक्षा खडसे,खासदार (सून) – रोहिणी खडसे (मुलगी)
जयंत पाटील – प्राजक्त तनपुरे,आमदार (भाचे)
अरुणकाका जगताप,आमदार – संग्राम जगताप,आमदार (मुलगा)
वल्लभ बेनके,माजी आमदार – अतुल बेनके,आमदार (मुलगा)