डोनेशन व फी आकारणीत बदल न केल्यास आंदोलन
उंब्रज – चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली डोनेशन व फी आकारणी यात योग्य ते बदल करावेत व विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे व सहकारी यांनी महात्मा गांधी ज्यूनिअर महाविद्यालयाचे प्राचार्य पोतदार यांना नुकतेच दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाच्या धोरणानुसार व पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आपल्या शैक्षिणक संस्थेकडून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, त्यांच्या हक्कांच्या सोयी-सुविधा, त्यांना मिळणाऱ्या शैक्षिणक सवलती, त्यांचे संरक्षण मुख्यत: विद्यार्थिनींचे संरक्षण करणे, तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती व फी माफी वेळेवर मिळावी या मागण्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (देणगी प्रतिबंधक) कायदा 1987 प्रमाणे डोनेशन, देणगी, इमारत निधी, मेंटेनस घेणे कायद्याने गुन्हा आहे व ते कॉलेजने घेऊ नये महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या गरीब, गरजू विद्यार्थीना फी भरण्यासाठी सवलत मिळावी. शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार 11 वी 12 वीच्या मुलींसाठी गर्ल्स फ्री शीप नियमांतर्गत अकरावी, बारावीच्या सर्व मुलींना शिक्षण मोफत मिळाले पाहिजे, शासन निर्धारित प्रवेश फी आकारली जावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष रणजीत कदम, मिनाक्षीताई पोळ, गुरुनाथ थोरात, अजित कोळी, प्रवीण पवार उपस्थित होते.