वडगाव, तांबवे, उंडाळेसह अनेक गावात बैलजोड्यांची मिरवणूक
बालगोपाळांचा बेंदूर
कराडात रविवारपासूनच लहान मुलांनी घरगुती पूजनासाठी लागणारी तसेच मिरवणुकीसाठी लागणारी मातीचे बैल नेण्यासाठी येथील कुंभारवाड्यात मोठी गर्दी केली होती. सोमवारी शाळांना बेंदूर सणाची सुट्टी असल्याने या बालगोपाळांनी प्रत्येकाकडून एक असे मातीचे बैल गोळा केले. या बैलांची पूजा करीत हातगाड्यावर ठेवून त्यासमोर ढोल-ताशांच्या गजरात मातीच्या बैलांची गल्लीमधून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. यावेळी बालगोपाळांनी एकमेकांना गुलाल लावत तसेच रिमझिम पावसात मुक्तपणे नाचत बेंदूर सणाचा आनंद द्विगुणीत केला. मिरवणुकीनंतर सर्व मातीच्या बैलाचे घाटावर विसर्जन करण्यात आले.
कराड – वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या आवडीचा सण म्हणजे बेंदूर. हा सण सोमवारी कराडसह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणासाठी आठ दिवस आधीच शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळाली. कराड शहर व परिसरातील बाजारपेठ आकर्षक वेलबुट्टीच्या रेशमी झुली, बाशिंगे, पितळी शेंब्या, रंगीबेरंगी फुले व घुंगरांनी सजलेली बाजारपेठ पूर्वसंध्येला शेतकऱ्यांनी गजबजून गेली होती.
वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांच्या कौतुकाचा हा सोहळा अर्थातच बेंदूर सण हा महाराष्ट्रात आषाढ महिन्यात उत्साहात साजरा केला जातो. मात्र, अलिकडच्या काळात शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असल्याने बैलांची संख्याही कमी होत गेली आहे. असे असले तरी बैलांना पूजण्याच्या दिवसाची शेतकरी वाट बघतो. व बेंदूर सण साजरा करण्यासाठी बळीराजा उत्सुक असतो. आदल्या दिवशी बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकून तेल व हळदीने खांद मळणी केली जाते. मुख्य म्हणजे आजच्या दिवशी बैल सजवण्यासाठी नवीन कासऱ्यापासून बेंदरासाठी लागणारे सर्व साहित्य बैलाच्या अंगावर घालण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू असते.
कराड शहरासह काले, विंग, ओगलेवाडी, मसूर, उंब्रज, वाठार, रेठरे, वडगाव, उंडाळे, काले, तांबवे, शामगाव, कोपर्डे, नडशी, कार्वे, ओंड, पाचवड यासह अन्य गावातील बळीराजाने बैलांना सजवण्यासाठी आकर्षक रेशमी झुली, भिंगाची बाशिंगे, पितळी शेंब्या, रंगीबेरंगी फुलांचे हार, तोडे, गळ्यात व पायात छमछमणाऱ्या घुंगराच्या आणि फुलांच्या माळा, काळ्या कंठ्यात गुंफलेल्या पितळी घंट्या, कासरे, गोंडे, कवडी माळा, तिरंगा माळ यासह विविध सजावटीच्या वस्तूंनी बैलांना सजवले होते. त्यांना पुराण पोळीचा नेवैद्य खाऊ घालून काही ठिकाणी सर्जा-राजाचे कौतुक करण्यासाठी गावातून मिरवणूकही काढण्यात आली. शहर व परिसरातील बाजारपेठेत शेतकऱ्यांचा बेंदराच्या सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता.