हडपसर – महाराष्ट्र केसरी विजेता ठरल्यानंतर आता अधिक जबाबदारी आली आहे. त्यामुळे भरपूर सराव करून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने आपण आता तयारी सुरू केली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर पदक मिळवून देणार असल्याचा संकल्प महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याने व्यक्त केला आहे.
महंमदवाडी येथे बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख नाना भानगिरे यांच्यावतीने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला एक लाख रुपयांचा धनादेश देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र केसरी विजेता राक्षे याने आपली भावना व्यक्त केली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, जय महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना जिल्हा प्रमुख निलेश माझिरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, संतोष भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, अभिजित बाबर, कपिल काळे, बबलू पटेल, अमित दाभाडे आदीजण उपस्थित होते.
शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की क्रीडा क्षेत्रात नवनवीन खेळ विकसित होत आहेत. खेळाला आता एक ‘करिअर’ म्हणून बघण्याची वृत्तीही सर्वत्र विकसित होताना दिसत आहे. खेळात ‘करिअर’ करण्यासाठी आज अनेक होतकरू खेळाडू तयार झालेले आहेत.आज महाराष्ट्र केसरीच्या रूपाने पैलवान शिवराज राक्षे याला राष्ट्रीय स्तरावरील खेळ खुणावत आहेत. भविष्यात त्याने मिळालेल्या प्रत्येक खेळांत उज्वल यश मिळवावे. त्याला शासकीय सेवेत समावेश तसेच पुढील सरावासाठी काही आर्थिक सहाय्य सरकार स्तरावर देता येईल का, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत.