कर्जत – आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेला राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. अंतिम स्पर्धेत पुण्यातील हडपसर येथील अनुजा नितीन शेवाळे यांनी विजेतेपदावर नाव कोरले. 2 लाख 22 हजार 222 रुपये, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा देण्यात आली.
सोमवार रात्रीपासूनच राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी शर्यतप्रेमी कर्जत शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी नोंदणी सुरू झाली आणि त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले. अवघ्या राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असल्याचे पहायला मिळालं.
राज्यभरातील तब्बल 264 बैलगाडी या स्पर्धेत सहभागी झाले होते. दिवसभर स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अत्यंत अटीतटीची लढत स्पर्धेच्या ठिकाणी पहायला मिळाली. अंतिम स्पर्धेत हडपसर येथील अनुजा नितीन शेवाळे यांनी विजेतेपदावर नाव कोरले. द्वितीय क्रमांक राजू मासाळ लोणंद तर तृतीय पारितोषिक अंश उत्तम गवळी, बदलापूर यांना मिळाले. खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत स्पर्धेचा थरार कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर पाहायला मिळाला.
एकूण 35 गट सकाळपासून संध्याकाळपर्यंत या शर्यतीत पळविण्यात आले. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेतील विजेत्यांना 2 गटात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये अंतिम स्पर्धा आणि द्वितीय स्पर्धा अशी विभागणी करण्यात आली होती. दोन्ही विभागात प्रत्येकी 7 असे 14 बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली.
विजेत्यांना पटकावली लाखोंची बक्षिसे
अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बैलगाडी मालकाला 2 लाख 22 हजार 222 रुपये, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा तर द्वितीय आणि तृतीय आलेल्या विजेत्यांना अनुक्रमे 1 लाख 11 हजार 111 रुपये आणि 77 हजार 777 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले. द्वितीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे 51 हजार 111, 41 हजार 111 आणि 31 हजार 111 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.