मुंबई- पाकिटमार चोरट्याने एका 30 वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री विरार परिसरात घडली. हर्षल वैद्य (वय-30, रा. विलेपार्ले, मुंबई) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी चोरटा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रेल्वेमध्ये चोरीच्या घटनांचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले भागात राहणारा हर्षल नवरात्री निमित्त आपल्या नातेवाईकांकडे विरार येथे आला होता. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तो परत आपल्या घरी विरार येथे जात होता. यावेळी विरार रेल्वेस्थानकावर पोचला असता चोरट्याने त्याचे पाकीट हिसकावून पळ काढला. हर्षलने त्याचा पाठलाग करून पकडले.
यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यातच चोरट्याने धारदार शस्त्राने हर्षलवर वार करून त्याला जखमी केले. परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ जवळील संजीवनी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.