पुणे – शहरातील कोंढवा बुद्रुकमधील उच्चभ्रु सोसायटीत आयटी इंजिनिअरच्या डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या घरात आयोजित पार्टीच्या वेळी उपस्थित असलेल्या मित्रांनी कोणत्यातरी कारणामुळे गोळी झाडून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी सागर दिलीप बिनावत आणि दत्तात्रय देवीदास हजारे (दोघेही रा. कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश यशवंत तारळेकर (वय ४७, रा. कोंढवा बुद्रुक) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्फुर्ती तारळेकर (रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गणेश तारळेकर कोंढवा बुद्रुकमधील उच्चभ्रू सोसायटीत राहण्यास होते. कौटुंबिक वाद असल्यामुळे मागील दिड वर्षांपासून त्यांची पत्नी माहेरीच राहत असल्यामुळे ते घरात एकटेच राहत होते. सोमवारी सोसायटीतील नागरिकाने गणेश यांनी फ्लॅट न उघडल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली असता गणेश फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या डोक्याला पिस्तूलाची गोळी लागल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार रविवारी रात्री गणेशकडे पार्टीसाठी आलेल्या सागर आणि दत्तात्रय यांना पोलिसांनी ताब्यात घेउन चौकशी केली. त्यांनी गणेश यांच्यासोबत रविवारी दुपारी मद्यपान करून पार्टी करत होते. त्यावेळी कोणत्यातरी कारणाने दोघांनी मिळून गणेश यांच्यावर पिस्तूलातून गोळी झाडून खून केला.
त्यानंतर त्यांनी पिस्तूल ताब्यात घेउन फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून पळून गेले होते. त्यानंतर दोघांनी पिस्तूल एका विहीरीत फेकून दिले. पोलिसांनी मॅग्नेटच्या साह्याने पिस्तूल ताब्यात घेत जप्त केले. याप्रकरणी दोघांनी मिळून गणेशचा खून का केला, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी दिली.