मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्त पुढील वर्षात जून महिन्यात राज्य सरकारने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यांत सलग तीन दिवस शिवरायांवरील महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लागणाऱ्या 39 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवरून या निर्णयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त 2 जून ते 6 जून 2024 पर्यंत सरकारने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. याच दरम्यान, महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना, तरुण पिढीला करुन देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सलग तीन दिवस तीन प्रयोगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील नामवंत मंडळींना महानाट्य कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे. यासाठी होणाऱ्या आयोजन, प्रचार प्रसिद्धी आणि इतर खर्चासाठी 39 कोटींचा निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या महानाट्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती काम करेल. महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, महिला आणि बालविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरणे कार्यकारी अभियंता, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक, जिल्हा माहिती अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.
महासंस्कृती महोत्सवासाठी 73 कोटींचा निधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी 73 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या एकूण निधीतील प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 कोटींचा निधी हा महोत्सवाच्या आयोजनासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.