अयोध्या – अयोध्येमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षेसाठी काटेरी कुंपण, बांबूंचे अडथळे आणि सीसीटिव्ही देखील लावण्यात येणार आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात येणार आहे. मंदिर उद्गाटनाच्या दिवशीच्या तयारीचा भाग म्हणून ही व्यवस्था केली जाणार आहे.
बूम बॅरिअर्स नावाने ओळखले जाणारे काटेरी कुंपण भरधाव वाहनांची टायर पंक्चर करून जागेवर थांबवते. ही व्यवस्था काही महत्वाच्या ठिकाणी आणि हॉटेलांच्या प्रवेशद्वारांपाशी केली जात असते. यामुळे घातपाती कारवाया करण्यासाठी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जागेवरच थांबवले जाऊ शकेल, असे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक सीके श्रीवास्तव यांनी सांगितले.
मंदिराच्या उद्गाटनाच्यावेळी सुरक्षा ठेवण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या गेल्या आहेत. राम जन्मभूमी पथावर कोणतेही वाहन आल्यावर ते आपोआप स्कॅन केले जाईल. या वाहनामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू असल्यास या वाहनाला पुढील प्रवेशाची अनुमती दिली जाणार नाही. रस्त्यावर बसवलेले काटेरी कुंपण आपोआप वर येईल आणि वाहनाचे टायर पंक्चर केले जाईल. आणि सुरक्षा रक्षक या घुसखोरांना ताब्यात घेतील. ही व्यवस्था राम मंदिराच्या दिशेने जाणार् या सर्व रस्त्यांवर केली गेल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वत्र सीसीटिव्ही बसवण्यात आले आहेत. कमांड सेंटरने मार्गांचे रेड झोन आणि यलो झोन असे दोन विभाग केले आहेत.या सीसीटिव्हीचे चित्रीकरण साठवून ठेवले जाऊ शकते. गेल्या ९० दिवसांचे संपूर्ण शहराचे चित्रीकरण अजूनही साठवलेले आहे.