पिंपळे गुरव – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालवल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते लवकर घरी यावेत यासाठी पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मंदिरात महिलांच्या वतीने महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येत आहे.
पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मंदिरात रविवारी सकाळपासून महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगताप यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी पिंपळे गुरव येथील महिलांनी ग्रामदैवत भैरवनाथ देवाला रविवारी साकडे घातले आहे.
जगताप यांची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ते लवकरच बरे व्हावेत, यासाठी माजी महापौर माई ढोरे, शुभांगी जगताप, नगरसेविका उषा मुंडे, पल्लवी जगताप, सुषमा कदम, कावेरी जगताप, रवीना अंगोळकर, शोभा जांभूळकर, माधवी राजापुरे, ऊर्मिला देवकर आणि परिसरातील महिलांनी एकत्र येत पिंपळे गुरवचे ग्रामदैवत भैरवनाथ व माता जोगेश्वरी चरणी प्रार्थना केली. या वेळी महिलांनी सामूहिक महामृत्युंजय जपाचे पठण केले. ग्रामदैवत भैरवनाथाच्या कृपेने व जनतेच्या आशीर्वादामुळे भाऊ लवकर बरे होतील, असा विश्वास या वेळी महिलांनी व्यक्त केला.