पिंपरी : पिंपरी – चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती जगताप परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
आमदार जगताप यांना बुधवारी (दि. 13) अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये. दोन ते तीन दिवसांत जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते सर्वांना भेटीसाठी उपलब्ध होतील, असेही जगताप परिवाराने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही आमदार जगताप यांची प्रकृती स्थिर असल्याचा व्हिडीओ जारी केला आहे.