“ती’च आमच्या कामाची पावती – सोनटक्के
आंबेठाण -चाकण पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने पोलिसांना परिसरातील गुन्ह्यांवर वचक ठेवण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. त्यात औद्योगिक वसाहतीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथे नव्याने पोलीस चौकी उभारण्यात आल्याने औद्योगिक वसाहतीसह परिसरातील गुन्हेगारीला आळा बसल्याने नागरिकांचा पोलिसांवर विश्वास वाढला आहे. हीच आमच्या कामाची पावती असल्याचे मत महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी व्यक्त केले.
बालाजी सोनटक्के म्हणाले की, महाळुंगे इंगळे पोलीस चौकी हद्दीतील नागरिकांना भयमुक्त राहता यावे यासाठी कोणाच्याही दडपणाखाली न येता कायदा व सुवस्था राखण्यासाठी 2 पोलीस निरीक्षक, 4 उपनिरीक्षक व 60 पोलीस तैनात असल्याने गुन्हेगारी रोखण्यात यश आले आहे.
रात्री कामगारांची लुटमार, धमकावणे याला पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे आळा बसला आहे. तसेच कंपनीमध्ये होणारी दादागिरी व गुंडगीर यावर चाप बसला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेच्या छत्राखाली असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे सोनटक्के यांनी स्पष्ट केले.