जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोल्हापूर – वीजमीटरला छेडछाड करुन त्याची गती कमी करत 3 लाख 43 हजार 558 युनीटची वीजचोरी केल्याची घटना इचलकरंजी येथे उघडकीस आली असून या प्रकरणी महावितरणने कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन वीजचोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वीजचोरीपोटी 47 लाख 21 हजार तर तडजोड आकारापोटी 21 लाख अशा 68 लाख रुपयांचा दंड वीजचोरांना ठोठावला आहे.
इचलकरंजी ग्रामीण उपविभागातील यड्राव शाखेंतर्गत तारदाळ येथे शिवराज काशिनाथ लोले यांची मे. शिवराज टेक्सटाईल्स तर जगन्नाथ काशिनाथ लोले यांच आदिनाथ टेक्सटाईल्स नावाने पावरलूम कनेक्शनची वीजजोडणी आहे. जुलै-2019 महिन्यात अनुक्रमे 4 लाख 19 हजार व 5 लाख 48 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी या दोन्ही वीजजोडण्यांचा वीजपुरवठा बंद करण्याता आला.
दरम्यान 20 डिसेंबर रोजी उपकार्यकारी अभियंता श्री. सुनील आकिवाटे व सहाय्यक अभियंता श्री. अभिजीत बिरनाळे हे वीजकर्मचाऱ्यांना घेऊन मीटर तपासणीसाठी गेले असता वीजपुरवठा अनाधिकृतपणे जोडून तसेच मीटरला पाठीमागून छिद्र पाडून मीटरची गती केल्याचा संशय आला. त्यामुळे पंचासमक्ष दोन्ही मीटर काढून चाचणी विभागाला तपासणीसाठी पाठविण्यात आले असता मीटरची गती अनुक्रमे 35 व 52 टक्केने संथ केल्याचे समोर आले आहे.
मे. शिवराज टेक्सटाईल्सने 1 लाख 33 हजार 815 युनीट तर मे. आदिनाथ टेक्सटाईल्सने 2 लाख 9 हजार 742 युनीटची वीजचोरी केली. या दोन्ही ग्राहकांना वीजचोरीपोटी अनुक्रमे 18 लाख 61 हजार 183 रुपये व 28 लाख 60 हजार 116 रुपये दंड ठोठावला आहे. तर विद्युत कायद्यातील कलम 152 नुसार तडजोड आकार प्रत्येकी 10 लाख 50 हजार रुपये इतका दंड भरावा लागणार आहे.
तसेच मीटरला छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी शाखा अभियंता श्री. अभिजीत बिरनाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा -2003 कलम 135 व 138 नुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा (गुरनं-529/2019) नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्सटेबल श्री. बजरंग लाड करीत आहेत.
वीजचोरांची गय नाही- कोळी
इचलकरंजी विभागात विजेची मागणी मोठी आहे. महावितरणला पॉवरलूमसहव औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापराची इत्यंभूत माहिती ऑनलाईन मिळते. या माहिती अधारे गळती असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रीत करुन वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जात आहे.