पुणे, दि. 5 (अविनाश ढगे) – एसटी महामडंळाच्या मालवाहतूक करणाऱ्या “महाकार्गो’ सेवेचे कामकाज आता ऑनलाइन होणार आहे. यासाठीचा सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाले असून दि.16 नोव्हेंबरपासून ही व्यवस्था अंमलात येईल. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता येणार असून, इंडियन पोस्ट अथवा एखाद्या खासगी कुरिअर कंपनीप्रमाणे “महाकार्गो’देखील सेवा पुरवणार आहे.
कोविड काळात एसटीची वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे आर्थिक नुकसान होत होते. ते भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहूक क्षेत्रात प्रवेश केला. दि.21 मे 2022 रोजी रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून “महाकार्गो’ सेवाचे शुभारंभ करण्यात आला होता.
कोविड काळात सुरू झालेली मालवाहतूक (महाकार्गो) सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने शासकीय उत्पादनाची 25 टक्के मालवाहतूक ही “महाकार्गो’मार्फत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामंडळाच्या उत्पन्नात भरच पडली.
“महाकार्गो’ने जून 2022 पर्यंत 100 कोटी 97 लाखांची कमाई केली होती. महाबीज, बालभारती, एसीसी, अल्ट्राटेक यासारख्या संस्थांनी एसटीसोबत करार केला आहे. आता ही सेवेशी संबंधित कामकाज ऑनलाइन होणार आहे. आगारात नोंदणीपासून ते डिलिव्हरीपर्यंत सर्व काम ऑनलाइन होणार आहे. बुकिंग करताना वस्तू पाठविणाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल, तसेच वस्तू स्वीकारणाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल भरणे अनिवार्य असणार आहे.
भोसरी आणि पुणे येथे प्रशिक्षण
विभागीय स्तरावर प्रत्यक्ष हाताळणीबाबातचे प्रशिक्षण विभागीय व आगार स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. 9 ते 11 नोव्हेंबरदरम्यान भोसरी आणि पुणे येथे होणार आहे.
महाकार्गोचे काम होणार पेपरलेस, बुकिंगचे काम होणार जलद
नागरिकांना रोख किंवा ऑनलाइन पेमेंटचा पर्याय
आगारात मालवाहतुकीसाठी उपलब्ध ट्रकची माहिती मिळणार
आगारामार्फत केलेल्या बुकिंगचा दिनांकनिहाय शोध घेता येणार
चालकांचा बिल्ला नंबर निवडल्यास त्याची सर्व माहिती आपोआप नोंदविली जाणार
ट्रकमध्ये जागा उपलब्ध असल्यास त्या मार्गावरील सर्व आगारांना पार्ट लोड करीता उपलब्ध
डिलिव्हरी केल्यानंतर तो ट्रक ऑनलाइन बुकिंगसाठी दिसेल
रद्द, अयशस्वी आणि गहाळ मालाची जबाबदारी निश्चित होणार
एका क्लिकवर मिळणार मालवाहतुकीच्या उत्पन्नाची सर्व माहिती
सर्व रिपोर्टं मिळणार ऑनलाइन