नवी दिल्ली – महादेव ॲपचा प्रवर्तक आणि मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरला दुबईमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून चंद्राकर याच्याविरुद्ध जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसची दखल घेत यूएई सरकारने ही कारवाई केली आहे. मात्र, ईडीने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईतील सौरभ चंद्राकरच्या ठिकाणाला टाळे ठोकण्यात आले असून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. चंद्राकरला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. दुबईतून मिळालेल्या वृत्तानुसार सौरभ चंद्राकर याला घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याला सोडून दिल्यास तो पळून जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. यूएईचे अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. दुबईचे अधिकारी त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची भारतीय अधिकारी वाट पाहत आहेत.
महादेव बेटिंग ॲप ऑनलाइन सट्टेबाजीसाठी डिझाइन केलेले आहे. यावर यूजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाचे लाइव्ह गेम्स खेळायचे. ऍपच्या माध्यमातून क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, निवडणुका या खेळांमध्येही बेकायदेशीर सट्टा लावला जात होता. बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कद्वारे ॲपचे नेटवर्क वेगाने पसरले आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक खाती उघडण्यात आली. याॲपद्वारे फसवणुकीची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली होती.