Australia vs Pakistan 2nd Test Day 2 Highlights : मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाने आपली पकड घट्ट केली आहे. पहिल्या डावात 318 धावा केल्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघानं पहिल्या डावात 194 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पाकिस्तान अजूनही 124 धावांनी मागे आहे. अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शान मसूद यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने एकवेळ एका विकेटच्या मोबदल्यात 124 धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर यानंतर 70 धावा करताना संघाने आणखी पाच विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार पुनरागमन करत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि ऑफस्पिनर नॅथन लायनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे.
.@shani_official and @imabd28 lead Pakistan’s reply with half-centuries.@iMRizwanPak and Aamir Jamal will resume batting for Pakistan tomorrow 🏏#AUSvPAK https://t.co/gpe1AGEhbp pic.twitter.com/dqNDcb4Iu9
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 27, 2023
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी शेवटच्या सहा विकेट्स अवघ्या 68 धावांत गमावल्या. एकेकाळी कांगारूंची धावसंख्या अवघ्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 250 धावा होती, पण पाकिस्तानी गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत कांगारूंना 318 धावांत गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीच्या फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करता आला नाही. यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर मिचेल मार्शने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्क 09 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, कर्णधार पॅट कमिन्स 13 आणि नॅथन लायनने 08 धावा केल्या.
पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज आमिर जमाल सर्वात यशस्वी ठरला. आमिरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याने मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांना आपले बळी बनवले. तर शाहीन शाह आफ्रिदीने ट्रॅव्हिस हेड आणि अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय मीर हमजा आणि हसन अली यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. सलमान आघानेही एक विकेट घेतली.
शानदार सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव गडगडला…
दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. सलामीवीर इमाम उल हक अवघ्या 10 धावा करून लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. अब्दुल्ला शफीक 109 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 62 धावा करून बाद झाला. तर मसूद 76 चेंडूत 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
याशिवाय बाबर आझम 01, सौद शकील 09 आणि आगा सलमान 05 धावा करून बाद झाले. आता मोहम्मद रिझवान 34 चेंडूत 29 धावा करून नाबाद आहे. रिझवानने आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार मारला आहे. त्याच्यासोबत आमिर जमाल 02 धावांवर खेळत आहे.
पहिल्या दिवशी काय झाले?
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि पहिल्या दिवशी केवळ 66 षटकांचा खेळ होऊ शकला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात तीन गडी गमावून 187 धावा केल्या होत्या.