महाबळेश्‍वर, पाचगणीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वरला निसर्गाचे वरदान आहे. त्याचे संवर्धन करून महाबळेश्‍वर पर्यटनस्थळासह तालुक्‍याचा सर्वांगिण विकास करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान ठेवून महाबळेश्‍वर-पाचगणी आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटनस्थळ होण्यासाठी महायुती शासनाच्या माध्यमातून व उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाई विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांनी दिली.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाबळेश्‍वर येथे काढण्यात आलेल्या रॅलीनंतर शिवाजी चौकात झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. टॅक्‍सी चौकातून फटाक्‍यांच्या आतषबाजीत रॅली सुरू झाली. “एक नेता एक आवाज, उदयनमहाराज उदयनमहाराज’, “मदनदादा भोसले तुम आगे बढो, हम तुमारे साथ है’, “महायुतीचा विजय असो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

रॅलीमध्ये उदयनराजे, मदन भोसले, महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, किसन शिंदे, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सपकाळ, महाबळेश्‍वर अर्बन बॅंकेचे चेअरमन राजेश कुंभारदरे, राजेंद्र गुजर, विकास शिंदे, नितीन भिलारे, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषा ओंबळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेलार, संतोष जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन वाघदरे, माजी सभापती विजय भिलारे, किसन भिलारे, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुभाषचंद्र बोस चौक, बाजारपेठ, शिवाजी चौक, मुस्लिम मोहल्ला, कोळी आळी या मार्गाने काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीनंतर कोपरा सभा झाली.

मदन भोसले म्हणाले, महाबळेश्‍वर शहर व तालुक्‍यात इको सेन्सेटिव्ह झोन, हरित लवादामुळे येणाऱ्या अडचणी, गावठाणवाढ, एफएसआय वाढीचा प्रश्‍न, शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, या अडचणी सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रयत्न केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटन, रोजगार, सिंचन यासाठी सातारच्या सभेत सकारात्मक भूमिका घेतली. महाबळेश्‍वर तालुक्‍याला अपेक्षित असलेला विकास केंद्र व राज्य शासनाकडून केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी मला व उदयनराजेंना प्रचंड मताधिक्‍याने निवडून द्यावे.

उदयनराजे म्हणाले, महाबळेश्‍वरातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी येथे येणाऱ्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये स्थानिक खासदार, आमदार, नगपालिका पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यासाठी आघाडी शासनाला कळविले होते; परंतु तसे झाले नाही. कृषी पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न आहे. माझी बांधिलकी समाजाशी आहे. त्यात मी कुठेही कमी पडणार नाही.

दरम्यान, महाबळेश्‍वर टॅक्‍सी युनियनचे सचिव सी. डी. बावळेकर व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुस्लिम संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक शेख, सलीम बागवान, बाबू मुलाणी, बाबाजी उंबरकर, वाहतूक सेना अध्यक्ष गोपाळ लालबेग, शहर संघटक नाना कदम, राहुल शेलार, आकाश भेदे, उस्मान खरखंडे, बाळकृष्ण ढेबे, नंदू बावळेकर, सुशील झाडे, आकाश साळुंखे, मोहसीन नदाफ, संजय पंडित, राज साळवी, हेमंत शिंदे, दत्तात्रय बावळेकर, मधुकर बिरामणे, वैशाली भिलारे, विकास दानवले, गणेश उत्तेकर, चेतन पार्टे, प्रमोद भिलारे, नारायण देवघरे, दत्तात्रय आमराळे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)