पाण्याचे पुढील ५० वर्षांचे नियोजन भाजपने केले आहे – संदीप कस्पटे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दरवर्षी 10 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. गेल्या 9 वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल 10 लाख वाढली आहे. लोकसंख्या वाढीचा वेग देशातील अन्य शहरांपेक्षा पिंपरी-चिंचवड शहराचा अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील 50 वर्षांचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत.

भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना या तीन धरणातून शहरासाठी 400 एमएलडी पाणी शासनाने आरक्षण मंजूर केले आहे. हे पाणी आणण्याच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यातून शहराच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथे आयोजित कोपरा सभेत संदीप कस्पटे बोलत होते. ते पुढे म्हणाले, चांगल्या व सक्षम पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे भोसरी, चिंचवड, चाकण, तळेगाव येथील औद्योगिक कंपन्या तसेच हिंजवडी आयटी पार्क यांमुळे देशभरातील नागरिक वास्तव्यासाठी शहराला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या शहराची लोकसंख्या देशातील अन्य शहरांच्या तुलनेत जास्त वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दरवर्षी 10 टक्क्‌यांनी वाढत आहे.

1988 मध्ये शहराची लोकसंख्या 3 लाख 76 हजार होती. ती 2011 मध्ये 17 लाख 30 हजार 133 वर पोचली. गेल्या 9 वर्षांत या लोकसंख्येत तबब्ल 10 लाखांची भर पडली आहे. आजमितीला शहराची लोकसंख्या 27 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला महापालिकेमार्फत पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा दररोज पुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे असलेल्या बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी नागरिकांना विविध भागांतील पाण्याच्या टाक्‍यांमधून पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.

राज्याच्या जलसंपदा खात्याने 2011 मध्ये पिंपरी-चिंचवडमधील 17 लाख लोकसंख्येला पवना धरणातील एकूण पाणीसाठ्यांपैकी 379 एमएलडी एवढे पाणी मंजूर केले. गेल्या 9 वर्षांत शहराची लोकसंख्या 10 लाखांनी वाढल्यानंतर देखील जलसंपदा खात्याने जेवढ्या पाण्याला मंजुरी दिली, तेवढेच म्हणजे 379 एमएलडी पाणीच आजच्या लोकसंख्येला पुरविले जात आहे. याचाच अर्थ 17 लाख लोकसंख्येसाठी मंजूर पाणी आज 27 लाख लोकांची तहान भागवत आहे. त्यामुळेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुढील 50 वर्षांचे नियोजन करून शहरासाठी अतिरिक्‍तपाणी आणण्याचे काम हाती घेतले आहे. सरकारने पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा-आसखेड या धरणातील 167 एलएलडी, आंद्रा धरणातील 100 एमएलडी आणि पवना धरणातील 133 एमएलडी असे एकूण 400 एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर केले आहे.

हे पाणी आणण्यासाठी सिंचन पुनर्स्थापन खर्चाच्या पहिल्या हप्त्यापोटी महापालिकेने आंद्रा धरणासाठी 20 कोटी, भामा-आसखेड धरणासाठी 20 कोटी 87 लाख आणि पवना धरणासाठी 10 कोटी अदा केले आहेत. हे पाणी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी याठिकाणी 100 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी 144 कोटींच्या प्रकल्प कामाला भूमिपूजनानंतर सुरूवात करण्यात आल्याचे कस्पटे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.