नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये नुकतेच एका दलित व्यक्तीवर मुजोर तरुणाने लघुशंका केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यावरून देशभरात खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता याच प्रकरणाची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशमध्ये झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील जुगेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटिता गावात एका आदिवासी तरुणाच्या कानात लघुशंका केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशातील या घटनेचा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. हा व्हायरल व्हिडिओ 11 जुलैचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता एकमेकांना अगोदरपासूनच ओळखतात. घटनेच्या दिवशी दोघांनी एकत्र दारू प्यायली होती. यादरम्यान दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद सुरु झाला. त्यानंतर आरोपी जवाहर पटेल याने गुलाबच्या कानात लघुशंका केली.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसपी डॉ.यशवीर सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरोपीला अटक केली. पीडित व्यक्तीने आपण नशेत असल्याने आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाण झाली नाही. मात्र आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कलमांतर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.