मधुर भांडारकरने करोना लॉकडाऊनच्या काळात केलेल्या “इंडियाज लॉकडाऊन’ला सेन्सॉर बोर्डाने “ए’ सर्टिफिकेट दिले आहे. एवढेच नव्हे तर या सिनेमातील 12 दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री देखील लावली आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2020 मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्यावेळी देशातील नागरिकांची काय हालत झाली होती,
हे दाखवण्यासाठी या सिनेमात चार प्रमुख व्यक्तिरेखांचे वेगळे वेगळे प्रवास दाखवले गेले आहेत. सेन्सॉर बोर्डाने ज्या 12 दृश्यांना कात्री लावली आहे, त्यात 2 दृश्ये आणि 10 संवादांचा समावेश आहे. सिनेमात वेश्यावस्तीमधील संवाद आणि काही दृश्यांचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात रेडलाईट एरियामधील वेश्यांची स्थिती काय झाली होती,
हे पाहाण्यासाठी गेलेल्या पत्रकार महिलेला आलेल्या अनुभवांचे चित्रण असलेल्या दृश्यात हे आक्षेपार्ह संवाद होते. याशिवाय मोबाइल फोनवरील व्हिडीओ क्लीपवरही सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.
मधुर भांडारकरने सेन्सॉर बोर्डाची सूचना आपल्याला मान्य आहे, असे म्हटले आहे. प्रतिक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, सई ताम्हणकर, आहना कुमरा, झरीन शहाब ही मंडळी “इंडियाज लॉकडाऊन’मधील प्रमुख कलाकार आहेत.