मुंबई – बॅंकिंग क्षेत्राचा प्रदिर्घ अनुभव असलेल्या मधाबी पुरी बुच यांची शेअर बाजार नियंत्रक सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 57 वर्षीय मधाबी पुरी सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होणार आहेत. या महत्वपूर्ण पदावर अगोदर सरकारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. प्रथमच खासगी क्षेत्रातील व्यक्तीला हे पद देण्यात आले आहे. सध्या या पदावर कार्यरत असलेले अजय त्यागी यांची मुदत 28 मार्च रोजी समाप्त झाली आहे.
मधाबी पुरी यांच्याकडे तीन दशकांचा बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील अनुभव आहे. मधाबी पुरी यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात आयसीआयसीआय बॅंकेतून केली. 2009 ते 2011 या काळात त्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. काही काळ त्यांनी हॉंग कॉंग मधील बॅंकिंग क्षेत्रामध्ये काम केले आहे. सेबीमध्ये त्या पाच वर्ष पूर्णवेळ संचालक होत्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मधाबी पुरी यांची तीन वर्षासाठी नियुक्ती केली आहे.