पिंपरी – पोलीस भरतीतील 720 पदांकरिता परीक्षा झाली. यामध्ये काही परीक्षार्थिंनी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांचा निकाल राखून ठेवत 686 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 720 पदांची लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. प्रचलित शासन निर्णय परिपत्रक व महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) 2011 व (सुधारणा) नियम 2019 नुसार पोलीस भरती निवड समितीने 720 पदांपैकी 686 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे. तसेच एकूण 363 पदांपैकी 355 उमेदवारांची तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे www.pcpc.gov.in व www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पोलीस भरती दरम्यान काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे 720 तात्पुरत्या निवड यादीमधील 34 उमेदवारांचा व 363 प्रतीक्षायादी मधील 08 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे अशा उमेदवारांना निकाल राखून ठेवलेबाबत त्यांचे ईमेल आयडीद्वारे कळविण्यात आलेले आहे.
भविष्यामध्ये उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केला होता असे निष्पन्न झाल्यास निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याचा अंतिम निर्णय पोलीस भरती समितीने राखून ठेवलेला आहे. समान गुण असलेले उमेदवारांची निवड गृह विभाग शासन निर्णयाप्रमाणे करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.