पुणे – सूर्यग्रहण, चंद्रग्रहणासारख्या खगोलीय घटनांमधून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागण्यात मदत होते. अशीच आणखी एक पर्वणी विज्ञानप्रेमींना अनुभवता येणार आहे. दि. 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चंद्रग्रहण होत असून, 2023 या वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण असेल. भारतात मध्यरात्री 1.05 वाजेपासून 2.22 पर्यंत “खंडग्रास’ स्थितीतील हे चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. सुमारे 1 तास 19 मिनिटे चंद्र हा ग्रहणाच्या स्थितीत असेल.
चंद्रग्रहण म्हणजे…
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा ग्रहणासारख्या घटना घडतात. सूर्य आणि चंद्रामध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहूच शकत नाही. ही स्थिती म्हणजे चंद्रग्रहण होते. ही घटना पौर्णिमेला घडत असते.
खग्रास चंद्रग्रहण म्हणजे…
संपूर्ण चंद्रग्रहणाला खग्रास म्हणतात. चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतो तेव्हा हे घडते. या स्थितीत पृथ्वी सूर्याला पूर्णपणे व्यापते आणि सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही.
खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे…
जेव्हा पृथ्वी सूर्याकडून चंद्रावर पडणारा थोडा प्रकाश अडवते, तेव्हा खंडग्रास चंद्रग्रहण स्थिती असते. यामध्ये काही काळ चंद्राची कोर दिसते.
छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे…
पृथ्वीची प्रच्छाया चंद्रावर पडते, तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास स्थिती दिसू शकते. पण ,जेव्हा पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडते तेव्हा त्या पुसटशा सावलीनं जे ग्रहण दिसतं, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.
आज चंद्र-गुरू ग्रहाची युती
शरद पौर्णिमेला होणाऱ्या या ग्रहणावेळी चंद्रासोबत पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती दिसेल. गुरू ग्रह पुढील आठवड्यात पृथ्वी जवळ येत असल्याने आकाराने मोठा आणि तेजस्वी दिसेल.
कोणत्या वेळी ग्रहण होईल?
दि. 28 ऑक्टोबरच्या रात्री बारानंतर चंद्र हळूहळू पृथ्वीच्या छायेत प्रवेश करेल. त्यानंतर हळूहळू चंद्रावरची पृथ्वीची छाया गडद होईल.
भारतातून दिसेल का?
हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. पश्चिम पॅसिफिक महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर-पूर्व उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण पॅसिफिक महासागर या भागातून हे चंद्रग्रहण दिसू शकेल.