मुंबई – क्वांटन डीकॉक, इवान लेविस, कर्णधार लोकेश राहुल व आयुष बदोनी यांनी केलेल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. यंदाच्या मोसमातील चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. लखनौने अत्यंत अटीतटीचा हा सामना जिंकला व स्पर्धेतील पहिलाच विजय साकार केला.
विजयासाठी 211 धावांचा पाठलाग करताना लखनौ संघाच्या डावाची सुरुवातही आक्रमक झाली. कर्णधार लोकेश राहुल व क्वांटन डीकॉक यांनी 99 धावांची सलामी दिली. राहुल अफलातून फलंदाजी करत होता. मात्र, पुरॉलचा फटका मारताना तो चुकला व अंबाती रायडूने अप्रतिम झेल घेत त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने 40 धावा करताना 26 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार खेचले. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेने साफ निराशा केली. डीकॉकने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. त्याने इवान लेविसह मोलाची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. अर्धशतक झाल्यावर मात्र डीकॉक वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात 45 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 61 धावा काढून बाद झाला.
लेविसने दीपक हुडाला हाताशी घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हुडाने 1 चौकार व 1 षटकार फटकावताना 13 धावा केल्या, पण आत्मघातकी फटका मारून बाद झाला. तो बाद झाल्यावर आलेल्या आयुष बदोनी याने लेविसला सुरेख साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 40 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. लेविसने नाबाद अर्धशतकी खेळी करताना 23 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. बदोनीने पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध करताना 9 चेंडूत 2 चौकार फटकावताना नाबाद 19 धावा केल्या. रॉबिन उथप्पा, शिवम दुबे व मोईन अली यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 211 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर ऋतूराज गायकवाड अपयशी ठरला. अनावश्यक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो 4 चेंडूत 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर उथप्पाने मोईन अलीसह अर्धशतकी भागीदारी केली. त्याचवेळी अर्धशतक फटकावलेला उथप्पा बाद झाला. त्याने आपल्या 50 धावांच्या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली.
मोईन अलीने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत संघात पुनरागमन केले. तो आवेश खानच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला. त्याने संघाला शतकी धावसंख्या गाठून देताना 35 धावांच्या खेळीत 22 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर शिवम दुबेने अंबाती रायडूला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी करताना आक्रमक फलंदाजी केली. रायडू 27 धावांवर परतला. त्याने 20 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले.
दुबे मात्र, अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो 30 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. कर्णधार रवींद्र जडेजाने 3 चौकारांसह 9 चेंडूत आक्रमक 17 धावांची खेळी केली व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह संघाचे द्विशतक फलकावर लावले. धोनीने नाबाद 16 धावा करताना 6 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार मारला. चेन्नईने 20 षटकांत 7 गडी गमावून 210 धावा उभारल्या. लखनौकडून रवी बिष्णोई, ऍण्ड्रयु टाय व आवेश खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 7 बाद 210 धावा. (रॉबिन उथप्पा 50, शिवम दुबे 49, मोईन अली 35, आंबाती रायडू 27, रवींद्र जडेजा 17, महेंद्रसिंह धोनी नाबाद 16, रवी बिष्णोई 2-24, आवेश खान 2-38, ऍण्ड्रयु टाय 2-40). लखनौ सुपर जायंट्स – 19.3 षटकांत 4 बाद 211 धावा. (लोकेश राहुल 40, क्वांटन डीकॉक 61, इवान लेविस नाबाद 55, आयुष बदोनी नाबाद 19, ड्वेन प्रिटोरीयस 2-31, ड्वेन ब्राव्हो 1-35, तुषार देशपांडे 1-40).