नवी दिल्ली – देशात सर्वसामान्य विरुद्ध महागाई असे युध्द सुरु आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधले जेवण महाग होऊ शकते.
19 किलोच्या एलपीजी गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ केली. तर 5 किलोच्या एलपीजी सिलिंडरमध्ये 27 रुपयांची वाढ केली आहे. विना सब्सिडीवाल्या 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. तूर्त घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे
या नवीन दरवावाढीनंतर नवी दिल्लीत 19 किलोचा वाणिज्य वापरातील गॅस सिलिंडर 2012 रुपयांना झाला आहे. तर 5 किलो सिलिंडरचा दर 569 रुपये आहे. मुंबईत 19 किलोच्या सिलिंडरचा दर 1962 रुपये, चेन्नईत 2185.5 रुपये झाला आहे. तर कोलकात्यात 19 किलोच्या सिलिंडरसाठी 2089 रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरु आहे. त्यामुळे या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर पडला आहे. जागतिक कमोडिटी बाजारात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या आयातीवरील खर्च वाढला असून, पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली आहे.