केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा : मोहिमेत अडथळे
पुणे – कमी खाटांच्या खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्र सुरू करण्याला केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. अशा साठ ते सत्तर खासगी रुग्णालयांची यादी केंद्राकडे पडून आहे.
दोनशेपेक्षा अधिक खाटा नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला अद्याप केंद्राकडून मान्यता मिळाली नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. शहरातील सरकारी, तसेच केंद्र सरकारी आरोग्य योजना (सीजीएचएस), पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयात लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, त्यांची संख्या ठराविकच असून, तेथे होणाऱ्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात को-विन पोर्टलवर केंद्रांची नोंदणी होत नसल्याने लसीकरण प्रक्रियेत अडथळे येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पुण्यासह सर्व जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक खाटांची क्षमता असलेल्या खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, महापालिकेने शहरातील शंभर आणि दोनशे खाटांची क्षमता असलेल्या साठ ते सत्तर खासगी रुग्णालयांची यादी केंद्राकडे पाठवली आहे. परंतु, अद्याप त्याला मान्यता मिळाली नसल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
लसीकरणाला आणखी गती मिळेल
दोनशेपेक्षा अधिक खाटा असलेल्या खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू झाल्यास, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील को-मॉर्बिड व्यक्तींना 250 रुपयांमध्ये लस घेता येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास लसीकरण केंद्रे वाढून लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.